शारदाश्रममधील दिवस आठवले की काळ कसा झटकन निघून गेला त्याची जाणीव होते. ८६-८७ मध्ये सचिन तेंडुलकर , विनोद कांबळी यांच्या साथीने शारदाश्रमने हॅरिस , गाईल्स तसेच पाम बीच ढाल आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत जेतेपद पटकावून तिहेरी मुकुटाचा मान संपादला होता. कित्येक वर्षांपूर्वीच्या आठवणींची पाने चाळताना माझा मित्र व शालेय सहकारी सचिन तेंडुलकर वाढदिवस साजरा करतोय , अन या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा देताना बालपणीचे मस्तीचे दिवस आठवतात.
शारदाश्रमचा सराव असायचा तो शिवाजी पार्कवर , मुंबई क्रिकेटचीच नव्हे तर भारतीय क्रिकेटची पंढरी हा शिवाजी पार्कचा लौकिक. आचरेकर सरांची पाच नेटस असायची अन् विशेष म्हणजे या पाचही नेटस्वर सचिन न कंटाळता सराव करायचा. सराव संपला तरी त्याचा उत्साह कमी होत नसे. फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतही तो रममाण व्हायचा.
वडापाव हा सचिनचा वीकपॉईंट , विनोद आणि सचिनची वडापाव खाण्यात कॉम्पिटिशन लागायची , सहा-सात वडापाव ते सहज फस्त करायचे पण यातही सचिनच बाजी मारायचा. शिवाजी पार्क जिमखान्याच्या कँटिनमध्ये तेव्हा भेळही चांगली मिळायची , नेटसमधील सराव संपल्यावर आमचा मोर्चा वळायचा तो कँटिनकडे आणि वडापाव , भेळ यावर आम्ही ताव मारायचो.
शिवाजी पार्कवर क्रिकेटच्या अवलियांची कधी कमतरता जाणवत नाही , मला आठवतंय आम्ही शाळेत असताना राजाभाऊ नावाचे एक वयस्कर गृहस्थ शारदाश्रमचे सामने आवर्जून बघत असत आणि राजाभाऊंची खासियत म्हणजे ते आम्ही किती धावा काढणार , सामना कोण जिंकणार याचा अंदाज वर्तवित असत आणि त्यांचे अंदाज बहुधा तंतोतंत खरे ठरत असल्यामुळे आम्हा मुलांमध्ये ते पॉप्युलर होते , अजूनही ते पार्कात हजेरी लावतात.
सचिनचा उत्साह वाखाणण्याजोगाच , ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर तेव्हा डेनाईट क्रिकेट सामने खेळले जायचे , अर्थात ही गोष्ट आहे सतरा , अठरा वर्षापूवीर्ची. ठाण्यातील सामन्यात राजिंदरसिंग घई खेळत होता व त्याच्या गोलंदाजीवर सचिन खूष असायचा. घई भारतासाठी काही सामने खेळला. मी ठाण्यात राहत असल्यामुळे व सामना रात्री उशिरा संपल्यामुळे सचिनने माझ्या घरीच मुक्काम केला होता.
सचिन शारदाश्रममध्ये असताना काकांकडे राहायचा , तो शिवाजी पार्कमधील इंदवदन सोसायटीत. तिथे सचिनसह विनोद , मी आणि संतोष जाधव असे चौघांचे टोळकं एकत्र जमायचं , सचिनच्या काकांच्या घरात मग आम्ही खूप धमाल करायचो. गॉल्फचा पांढरा चेंडू घेऊन आम्ही खेळत असू. हा चेंडू चांगला उसळत असे व त्यामुळे खेळताना मजा यायची.
शारदाश्रमकडून खेळताना बरीच धमाल आम्ही करायचो , खासकरून क्रॉस , आझाद मैदानात आमची मॅच लौकर संपल्यावर आम्ही मेट्रो , लिबर्टी , एम्पायर या थिएटरमध्ये इंग्लीश सिनेमे बघायला जायचो आणि एकदा तर मोठी मजा आली होती. शिवाजी पार्कवरील आमची मॅच दुसऱ्या दिवशी सकाळी लौकर आटोपल्यावर आम्ही चौपाटीवर गेलो. ओहोटी असल्यामुळे आम्ही समुदात बरेच आत शिरलो व खेकडे पकडले यातही अर्थात सचिनच आघाडीवर होता. प्रशिक्षक दास शिवलकर मात्र आम्हाला शोधून हैराण झाले होते कारण त्यांना न सांगताच आम्ही चौपाटीवर धूम ठोकली होती. अखेरीस त्यांनी आम्हाला सज्जड दम भरला पण मासेमारीची मौज मात्र अनोखीच ठरली.
संगीतातही सचिनला भलतीच रूची. सचिनदेव बर्मन या नामवंत संगीतकारावरून नाव त्याला ठेवण्यात आलं आहे. शारदाश्ाममध्ये असतानाही तो अल्बम आवडीने ऐकायचा. डायर स्ट्रेटस हा त्याचा आवडता अल्बम , संगीतातील त्याची दिलचस्पी बालपणापासूनच.
-मयूर कद्रेकर, सचिनचा शाळासोबती
Thursday, May 22, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment